कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई करणार ; गृहराज्यमंत्री वळसे पाटील यांचे मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मशिदीवरील भोंग्याच्या मुद्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. अशात कायदा व सुव्यवस्था योग्य प्रकारे राहावी याबाबत मुंबईचे पोलीस महासंचालक व अधिकाऱ्यांची गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आढावा बैठक पार पडली. “गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, अशावेळी कुणीही कायदा हातात घेऊ नये अन्यथा कठोर कारवाई करू, असा इशारा देत वळसे पाटील यांनी मोठे विधान केले.

मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईतील बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील भोंग्यांबाबतचा हा प्रश्न नवीन नाही. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत काही निर्णय दिले आहेत. त्याअनुषंगाने सन 2015 आणि 2017 मध्ये राज्य सरकारने काही आदेश काढले आहेत. याबाबत लाऊडस्पीकर तसेच त्याच्या आवाजाच्या मर्यादांबाबत काय भूमिका असावी हे नमूद करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी वाद घडवून आणण्याबाबतचे प्रयत्न सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांना आदेश देण्यात आले असून त्यांचे परिस्थितीवर लक्ष आहे.

भोंग्यांबाबतच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी लवकरच सर्व प्रमुख विरोधी पक्षाचे नेते, राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहे. या बैठकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांना देखील बोलवणार असून त्यांच्याशीही चर्चा करणार असल्याची माहिती मंत्री वळसे पाटील यांनी दिली.

Leave a Comment