मुंबई । भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर IPLच्या तेराव्या हंगामासाठी VIVO या चिनी कंपनी सोबतचा करार बीसीसीआयने स्थगित केला. हा करार स्थगित केल्यांनतर बीसीसीआय सध्या नवीन स्पॉन्सर शोधण्याच्या तयारीत आहे. Jio, Byju’s, Amazon, Coca Cola हे ब्रँड तेराव्या हंगामाला स्पॉन्सरशिप देण्याच्या प्रयत्नात आहेत. यानंतर योगगुरु बाबा रामदेव यांचा पतंजली हा ब्रँडही आयपीएल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत उतरण्याच्या तयारीत आहे. इकोनॉमिक टाइम्सने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
“पतंजली हा बँड जागतिक पातळीवर पोहचावा यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी आयपीएलच्या तेराव्या हंगामाला स्पॉन्सरशिप देता येईल का यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत,” अशी माहिती पतंजली उद्योग समूहाचे प्रवक्ता एस.के. तिजारावाला यांनी इकोनॉमिक टाइम्सला दिली. यासाठी पतंजली लवकरच आपली निवीदा दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे.
भारत-चीन यांच्यात झालेल्या गलवान खोऱ्यातील संघर्षात २० भारतीय सैनिक शहीद झाल्यांनतर चिनी कंपन्यांसोबतचे करार सरकारने स्थगित केले. चिनी कंपनीसोबतचा करार मोडावा यासाठी बीसीसीआयवर भारतीय चाहत्यांकडून दबाव वाढत होता. भारतीय चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण लक्षात घेता बीसीसीआयने वर्षभरासाठी VIVO सोबतचा करार स्थगित केला आहे.
दरम्यान, आयपीएल स्पर्धेच्या स्पॉन्सरशिपसाठी VIVO ने बीसीसीआयला २१९९ कोटी रुपये दिले होते. प्रत्येक हंगामाला VIVO कंपनी बीसीसीआयला ४४० कोटी रुपये देत होती. आयपीएलच्या तेराव्या हंगामाची घोषणा करताना गव्हर्निंग काऊन्सिलने VIVO ची स्पॉन्सरशिप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. देशात चीनविरोधी वातावरण असताना पतंजलीने आयपीएलला स्पॉन्सरशिप देणं याने देशात त्यांच्या ब्रँडला मोठा फायदा होऊ शकतो असं काही तज्ज्ञांचे मत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”