हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जवळपास 3 महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडला. एकनाथ शिंदे यांच्यासमवेत 40 शिवसेना आणि 10 अपक्ष आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. आमदारांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यातच आता शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय का घेतला याबाबत उलगडा केला आहे.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या माझा कट्ट्यावर बोलतांना बच्चू कडू म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला जाणे आनंददायी नव्हते पण माझ्या मतदारसंघातले काही प्रकल्प अपूर्ण राहिले आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या संदर्भातील, दिव्यांगाच्या संदर्भातील काही प्रश्न सुटले नाहीत. हे प्रश्न सोडवण्याची उद्धव ठाकरेंची इच्छा होती. पण त्यांच्या आजूबाजूचे अधिकारी कामच करत नव्हते, दिव्यांग लोकांच्या संदर्भात अडीच वर्षात एकही मिटिंग झाली नाही, हे बरोबर नाही म्हणून मी एकनाथ शिंदे याना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
लोक विचारायचे की तुम्ही आता सत्तेत आहात राज्यमंत्री आहात. मग कामं का होत नाहीत? माझ्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल आजही आस्था आहे. पण ठाकरे मातोश्रीवर जेवढे शोभून दिसायचे. तसं त्यांचं काम वर्षा बंगल्यावर दिसलं नाही. एकनाथ शिंदे यांच्यामुळंचं मी महाविकास आघाडीला सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले.