हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या निर्घृण हत्येची छायाचित्रे सोमवारी रात्री समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेने जनतेत अस्वस्थता निर्माण केली आहे. सध्या या प्रकरणामुळे सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी जोरदार टीका केली आहे.
बच्चू कडूंचा सरकारवर हल्लाबोल
“धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन जबाबदारी संपत नाही. या अमानुष प्रवृत्तीला खतपाणी कोणी घातले? गुन्हेगारी मानसिकता वाढत आहे आणि गुंड प्रवृत्तीला राजाश्रय मिळतोय. आज सत्ता मिळवण्यासाठी लोक कोणत्याही थराला जात आहेत. हत्यारे उचलली जात आहेत, बलात्कार होत आहेत, आणि सत्तेसाठी कोणतीही मर्यादा ओलांडली जात आहे,” असे परखड मत बच्चू कडूंनी मांडले आहे.
बच्चू कडू यांनी जातीच्या मुद्द्यावर बोलताना म्हणले की, “मारणारा कोणत्या जातीचा आणि मरणारा कोणत्या जातीचा, हे महत्त्वाचे नाही. पण ज्या पद्धतीने ही हत्या करण्यात आली, ते धक्कादायक आहे. समाजात गुंडगिरीला बळ देण्याचा प्रकार वाढतो आहे, याचे गांभीर्य सर्वांनी ओळखले पाहिजे.”
बच्चू कडू पुढे म्हणाले, “गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी प्रवृत्तीला खुले समर्थन मिळाले आहे. महाक्रूर गुंड निर्माण होतात आणि त्यांना राजकीय अभय दिले जाते. वाल्मिक कराडसारख्या प्रवृत्तींना खतपाणी घालण्यात आले आणि आज हीच गुंडगिरी वाढली आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या राजीनाम्याचे कारण श्रद्धांजलीऐवजी आजारपण सांगितले. हे दुर्दैवी आहे आणि समाजात चुकीचा संदेश जातोय.”
त्याचबरोबर, “एकीकडे प्रभू रामचंद्राचे नाव घेतले जाते, तर दुसरीकडे अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना समर्थन दिले जाते. सरकारने आता ठोस भूमिका घ्यायला हवी. अन्यथा समाजात अस्थिरता निर्माण होईल.” असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.