हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीत बंड करत अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. तेव्हापासून अजित पवारांच्या मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना राजकिय वर्तुळात उधाण आलं आहे. त्यातच जर अजित पवारांनी शरद पवारांना भाजपसोबत आणलं तर त्यांना मुख्यमंत्री पद मिळेल असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केल्यानंतर या चर्चाना आणखी बळ मिळालं. मात्र आता एकनाथ शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मात्र अजित पवारांवर सडकून टीका केली आहे. अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर सरकारच वाटोळं होईल असं त्यांनी म्हंटल आहे.
गोंदियात प्रसार माध्यमांशी बोलत असताना बच्चू कडू म्हणाले, शरद पवार भाजपबरोबर गेले, तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात. अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर सरकारचं वाटोळं होईल. तसेच यावेळी बच्चू कडू यांनी शिंदे फडणवीसांना सुद्धा अल्टिमेटम देत वेळ पडल्यास स्वबळावर लढणार असल्याचे म्हंटल आहे. आम्ही विधानसभेची तयारी करतोय. 15-16 मतदारसंघात बांधणी सुरू केली आहे. जर शक्य झालं, तर युतीमध्ये आणि नाही झालं तर स्वबळावर लढण्याची आमची मानसिकता आहे.” असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.
दुसऱ्या बाजूला अजित पवार आपल्या आमदारांसहित शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे आता आमदारांची कोंडी निर्माण झाली आहे. तर मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाच्या मुद्द्यावरून शिंदे गटातील आमदार नाराज झाले आहेत. सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र या भेटी शिवसेनेला खटकत आहेत. परंतु असे असले तरी या भेटीमुळे अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत येतील का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकूणच बघितलं तर राज्याचे राजकारण रोज वेगवेगळ्या घटनांनी चर्चेत येत आहे.