सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन करणार; बच्चू कडूंचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही महिन्यांपूर्वी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या ऑनलाइन गेमच्या जाहिरातीवर आक्षेप घेतला होता. त्यावेळी त्यांनी ही जाहिरात त्वरीत बंद करण्यात यावी अशी विनंती देखील सचिन तेंडुलकरकडे केली होती. परंतु या विनंतीनंतर देखील प्रसार माध्यमांवर ऑनलाईन गेमिंगची जाहिरात दाखवण्यात येत आहे. त्यामुळे याप्रकरणी निषेध व्यक्त करत बच्चू कडू यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सचिन तेंडुलकर यांचीही जाहिरात बंद करण्यात आली नाही तर “आम्ही त्यांच्या घराबाहेर आंदोलन करू” असे बच्चू कडू यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

ऑनलाइन गेमिंग जाहिरातीविषयी बोलताना बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे की, “या ऑनलाईन गेममध्ये चुकूनही त्यांचा फोटो असलेले कुठे पोस्टर वगैरे आहे की नाही हे तपासलं पाहिजे. तसेच त्या ऑनलाईन गेमच्या जाहिरातीतून त्यांनी बाहेर पडलं पाहिजे. ही आमची विनंती आहे. ते नाही झालं तर आम्हाला पर्यायी मार्ग शोधावा लागेल. सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन गेमबाबतचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. ते भारतरत्न आहेत आणि भारताचे अभिमान आहेत”

त्याचबरोबर, “आम्ही सचिन तेंडुलकर यांना नारळपान देण्याचं आंदोलन करणार आहोत. लोकं सुपारी घेतात, तुम्ही नारळ घ्या. जाहिरातच नाही तर ऑनलाईन गेमच हद्दपार करा. आम्ही सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करू शकतो. सचिन तेंडुलकर भारतरत्न आहेत. त्यामुळेच आमचा त्यांनी जाहिरात करण्यावर विरोध आहे. ते भारतरत्न नसते तर आम्ही आंदोलन केलं नसतं. सचिन यांनी जाहिरातीतून माघार घेण्यासाठी आम्ही त्यांना 15 दिवसांची मुदत देऊ आणि त्यानंतर आम्ही आंदोलन करणार आहोत” असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

दरम्यान, सचिन तेंडुलकर भारतरत्न असताना देखील ते एका ऑनलाइन गेमची जाहिरात करत आहेत आणि या जाहिरातींचा चुकीचा परिणाम तरुणांवर होत आहे. अशी तक्रार एका व्यक्तीकडून बच्चू कडू यांच्याकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत बच्चू कडू यांनी ही जाहिरात बंद करण्यात यावी. अशी विनंती सरकारकडे केली होती. तसेच अशा जाहिरातींमध्ये सचिन तेंडुलकर यांनी काम करू नये ते त्यांच्या प्रतिमेला शोभणारे नाही अशी विनंती बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकरला केली होती. मात्र यानंतर देखील ऑनलाइन गेमिंगची जाहिरात माध्यमांवर दाखवण्यात येत आहे. त्यामुळे याचा निषेध करत बच्चू कडू यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता बच्चू कडू यांच्या विनंतीवर सचिन तेंडुलकर काय भूमिका घेईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.