औरंगाबाद – औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणूकीकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. निकालानंतर शिवसेना-भाजप युतीने विजय मिळवत युतीचा झेंडा फडकविला आहे. अब्दुल सत्तार आणि हरिभाऊ बागडे गटाने 14 पैकी 14 जागा जिंकत शिवसेना-भाजप गट विजयी झाला. तर विरोधी छुप्या कॉंग्रेस गटाचा सुफडासाफ झाला आहे. दूध संघाच्या निवडणुकीत शंभर टक्के मतदान झाले होते.
राज्यातील सेना-भाजप युतीसाठी आग्रही असलेल्या अब्दुल सत्तार यांनी भाजपला सोबत घेऊन दूध संघावर आपली सत्ता आणली आहे. औरंगाबाद तालुका मतदार संघातून संघाचे अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांच्या विरूद्ध कॉंग्रेसचे सुरेश पठाडे यांचा अर्ज कायम राहिल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती.
औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत महिलांच्या राखीव मतदार संघातील दोन जागांसाठीही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. आमदार हरिभाऊ बगाडे यांच्या पॅनलच्या अलका डोणगावकर आणि शीलाबाई कोळगे यांची लढत शारदा गीते आणि रुक्मिणीबाई सोनवणे यांच्यात झाली होती.