हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह बंडखोरी केल्यानंतर आता बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे चंपासिंह थापा हेदेखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नवरात्रीच्या निमित्ताने चंपासिंह थापा ठाण्यामध्ये देवीच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी ते म्हणाले की, आज मी शिंदे साहेबांना भेटलो. पहिल्यापासून शिवसेनेची सेवा करत होतो आता एकनाथ शिंदे साहेबांसोबत सेवा करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील चंपासिंग थापा यांचं शाल आणि फुलांचा गुच्छ देत स्वागत केल. ठाकरेंचे विचार थापालाही पटले नाहीत त्यामुळे त्याने आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला असं शिंदेनी सांगितले.
कोण आहे चंपासिंह थापा ?
नेपाळमधून भारतात आलेले चंपासिंह थापा याना भांडूपचे नगरसेवक के.टी. थापा यांच्या ओळखीने मातोश्रीवर प्रवेश मिळाला. त्यानंतर थापा हे बाळासाहेबांची सावली बनून त्यांच्या सोबत राहिले होते. कोणत्याही समारंभात किंवा दौऱ्यावेळी बाळासाहेबांसोबत ते कायम दिसले.बाळासाहेबांच्या जेवणाची, औषधाच्या वेळांची आणि दिनक्रमातील प्रत्येक लहानसहान गोष्टींची तो काळजी घेत असे. त्यामुळे थापा हा एक मातोश्रीतीचा महत्त्वाचा सदस्य बनला होता.