लातूर प्रतिनिधी | ५ वर्षांपूर्वी सत्तेवर आलेलं महायुतीचं सरकार हे भ्रष्ट आणि फसवं सरकार आहे. या सरकारने बेरोजगारी दूर करण्याच्या, शेतकरी कर्जमाफी करण्याच्या, पीकविमा देण्याच्या घोषणा हवेतच राहिल्या आहेत. जनतेला फक्त जाहिरातबाजीच्या माध्यमातून उल्लू बनवण्याचं काम राज्य सरकारने केलं असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी लातूरमधील औसा येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी राहुल गांधी, अशोक चव्हाण, मल्लिकार्जुन खर्गे, शिवराज पाटील, अमित देशमुख, बसवराज पाटील आणि इतर नेते उपस्थित होते.
सध्याची निवडणूक ही राज्यातील उमेदवारांची असून मोदींच्या नावावर मतं मागण्याचं काय कारण असा सवाल खर्गे यांनी विचारला. राज्यातील सिंचन व्यवस्था, शेतकऱ्यांचा पीक विमा, तरुणाईचा रोजगार प्रश्न याबाबत सरकार बोलणं टाळत असून घोषणांच्या जाहिरातबाजीत वास्तवाकडे दुर्लक्ष करण्याचं काम सरकार करत असल्याची टीकाही खर्गे यांनी केली.
लातूरमधील सभेचा एकूण सूर हा गांधी घराण्याचं वलय, गांधींच्या प्रतिमेचा आणि विचारसरणीचा प्रभाव यावर आधारलेला होता. काँग्रेसच्या विचारसरणीला अनुसरूनच लोकांनी मतदान करावं असं अमित देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितलं.