हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | खरं तर गणेश आणि त्याच्या भक्तांच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत. पण भक्त बल्लाळच्या म्हणण्यावरून श्री गणेशला पृथ्वीवर राहावे लागले. त्यानंतर हा गणपती पालीचा बल्लाळेश्वर म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यामुळं आपण आज अष्टविनायका पैकी एक असणारा पालीचा बल्लाळेश्वर गणपती बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. रायगड जिल्ह्यातील पाली या गावात बल्लाळेश्वराचे मंदिर आहे. सुधागड या भव्य किल्याची पार्श्वभूमी आणि अंबा नदीच्या निसर्गरम्य सानिध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसलेले आहे.
बल्लाळेश्वराची मूर्ती आणि मंदिर परिसर –
हे मंदिर पूर्वाभिमुख असून या गणपतीची सोंड डाव्या बाजूला आहे. ही मूर्ती स्वयंभू आहे. या गणेश मूर्तीचे कपाळ विशाल असून त्याच्या डोक्यात आणि बेंबीत हिरे आहेत. तर ही मूर्ती ३ फूट उंच आहे. बल्लाळेश्वराची हे मंदिर चिरेबंदी असून मंदिरात अनेक घंटा आहेत. हे मंदिर अशा प्रकारे उभारण्यात आले आहे की हिवाळ्यात दक्षिणायन सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. हे मंदिर संपूर्ण दगडी असून या दगडांना शिशाच्या रसाने एकमेकांबरोबर चिटकवले आहे. या मंदिराच्या मागे असलेल्या डोंगराच्या आकाराप्रमाणेच ही गणपती मूर्ती आहे.
आख्यायिका –
या गणपतीला बल्लाळेश्वर नाव का पडले याची एक खूप मोठी आख्यायीका आहे. त्रेता युगातील ही कथा आहे. पाली या गावी कल्याण नावाचा एक वाणी आपली पत्नी इंदुमती सोबत राहत होता. या दाम्पत्यांना बल्लाळ नावाचा एक मुलगा होता. तो गणेशाचा निस्सीम भक्त होता. त्यामुळे त्याने आपल्या मित्रांनाही गणेश भक्तीत सामावून घेतले होते.
एके दिवशी बल्लाळ आणि त्याच्या मित्रांना गावाच्या बाहेर एक खूप मोठा दगड आढळून आला. ही बल्लाळसोबत या दगडाला गणपती मानून त्याची पूजा करू लागले. ही मुले गणपतीच्या पुजेत एवढी मग्न असायची की त्यांना जेवायचे ही भान राहत नसे. त्यामुळे गावातील इतर मुलांच्या पालकांनी बल्लाळची त्याच्या वडिलांकडे तक्रार केली. त्याच्या वडिलांना क्रोध अनावर झाला आणि संतापाच्या भरात त्यांनी ते गणपतीचे देऊळ मोडून टाकले. व बल्लाळलाही रक्तभंबाळ होई पर्यंत मारले आणि झाडाला बांधून ठेवले.
बल्लाळला खूप मोठी दुखापत होऊनही त्याचा गणेश जप सुरुच होतात. त्याची ही गणेशभक्ती पाहून गणपती ब्राम्हणाच्या वेशात आला. तरी बल्लाळने त्याला ओळखले आणि गणपतीच्या चरणी नतमस्तक झाला. व त्याला वर मागायला सांगितले. त्यावर बल्लाळने गणपतीला तिथेच राहायला सांगितले व लोकांचे दुःख दूर करण्याचा वर मागितला. तेव्हा गणपती म्हणाला माझा एक अंश येथे राहील आणि माझ्या नावाच्या आधी तुझे नाव घेतले जाईल. येथील लोक मला बल्लाळ विनायक नावाने ओळखतील. असे म्हणून गणपतीने बल्लाळला आलिंगन दिले आणि तो जवळच्या दगडात लुप्त झाला. तेव्हा पासून हा या मूर्तीला आपण बल्लाळेश्वर नावाने ओळखतो.