व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शरद पवार माझे नेते, आजही त्यांच्याशी फोनवर बोलणं होतं; प्रफुल्ल पटेलांच्या विधानाने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडली असून अजितदादा गट आणि शरद पवार (Sharad Pawar)गट असे 2 गट पडले आहेत. भविष्यात हे दोन्ही गट एकत्र येणार कि नाही याबाबत अजूनही साशंकता आहे. अशातच एकेकाळचे शरद पवार यांचे विश्वासू आणि सध्या अजित पवार गटात असलेले नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी एक मोठं विधान करून खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार माझे नेते होते आणि यापुढेही राहतील. आजही माझं त्यांच्याशी फोनवर बोलणं होतं असं पटेल यांनी म्हंटल आहे.

प्रफुल्ल पटेल अमरावतीमध्ये असताना त्यांनी हे विधान केलं आहे. मागच्या वेळी मी अमरावतीला शरद पवार यांच्या सोबत आलो होतो. आज अजित पवार यांच्या सोबत आलो आहे. आमचा पक्ष बळकट करण्यासाठी मी आलो आहे. अनेकांच्या मनात संभ्रम आहे की खरंच मी इकडे आलो? की शरद पवार यांनी मला पाठवले का? शरद पवार साहेब यांच्याबद्दल असलेला आदर आजही कायम आहे. आणि पुढेही राहील. शरद पवार माझे नेते होते आणि पुढेही राहतील असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हंटल.

ते पुढे म्हणाले, मला 1978 साली शरद पवारांनी बोलवून घेतलं. तेव्हापासून मी त्यांच्यासोबतच आहे. त्यांचे आणि माझे आजही घरगुती संबंध आहेत. शरद पवार यांच्यासोबत माझं आजही फोनवर बोलणं होत असतं, असा प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. पटेल यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पटेल यांची ही विधाने म्हणजे भाजपवर एकप्रकारे दबाव तर नाही ना? अशाही शंका निर्माण झाल्या आहेत.