टीम, HELLO महाराष्ट्र । नवरात्रशोत्सव अवघ्या आठ दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. देवीसाठी काय काय बनवावं यावर महिला वर्गात घराघरात चर्चा सुरु आहे. यंदा तुमच्या देवीसाठी बालुशाही बनवायची असेल तर आम्ही तुम्हाला आज त्याची रेसिपी सांगणार आहोत. गोड प्रेमींना बालुशाही हा प्रकार आवडणार नाही असे होऊच शकत नाही. आज आपण बालुशाही घरी कशी बनवायची हे पाहणार आहोत. प्रथम यासाठी काय साहित्य लागते हे पाहुयात.
साहित्य
मैदा दीड कप ,साजूक तूप ४ टेबलस्पून , दही ६ टेबलस्पून , बेकिंग सोडा पाव चमचा , साखर दीड कप , वेलची पावडर पाव चमचा , पिस्ते ४-५ पातळ काप करून तूप / वनस्पती तळण्यासाठी
कृती
१. एका बाउल मध्ये मैदा घेऊन त्यात सोडा घाला. आता त्यात साजूक तूप घालून हाताने मैद्याच्या मिश्रणाला चोळून घ्या.
२. दही घुसळून घ्या. पाणी घालू नका. दही मैद्याच्या मिश्रणात घालून एकत्र करा आणि गोळाबनव. पीठ अजिबात मळू नका. पिठाच्या गोळ्यावर ओला कपडा घालून मिश्रण ४५ मिनिटं ठेवून द्या.
३. मिश्रणाचे दोन भाग करून एकावर एक ठेवा. आता परत दोन भाग करून एकावर एक ठेवा. असे ३-४ वेळा करा.
४. आता थोडं थोडं मिश्रण घेऊन हाताने व्यवस्थित गोळे करा. गोळे मधोमध अंगठ्याने दोन्ही बाजूनी दाबून घ्या म्हणजे तळल्यावर गोळा समतल होईल.
५. कढईत तळण्यासाठी तूप मध्यम आचेवर गरम करा. तूप कोमट असावे. मिश्रणाचे ३-४ गोळे हळूच तुपात सोडा. तळल्यावर गोळे फुलतात म्हणून एका वेळी जास्त गोळे तळायला घालू नका. आणि मंद आचेवर गुलाबी रंगावर तळून घ्या. हे तळायला खूप वेळ लागतो. तळलेले गोळे टिश्यू पेपर वर काढून घ्या.
६. दुसऱ्या गॅसवर एका पातेल्यात साखर आणि पाऊण कप पाणी घालून एक तारी पाक करून घ्या. पाक झाला की त्यात वेलची पावडर घाला आणि गॅस बंद करा.
७. तळलेले गोळे कोमट झाले की साखरेच्या पाकात घाला. २-३ मिनिटांनी परता. ५-६ मिनिटांनी ताटात काढून घ्या आणि पिस्त्याचे काप घालून सजावट करा.
८. स्वादिष्ट बालूशाही तयार आहे. फ्रिजमध्ये न ठेवता ७ दिवस टिकते.