सातारा | सातारा जिल्ह्यामध्ये कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने दि. 14.4.2021 रोजीच्या संध्याकाळी 8.00 वा.पासून ते दि. 1.5.2021 रोजीच्या सकाळी 7.00 वाजेपर्यंत संपुर्ण राज्यामध्ये संचारबंदी (कलम 144) जाहिर करुन, राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापान, दुकाने, हॉटेल्स, बार, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद करण्यात आलेले असून, चित्रिकरणावरही कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत.
अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थान प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यामध्ये यापूर्वी वेगवेगळ्या आदेशान्वये चित्रपट, लघुपट, वेबसिरीज व इतर सर्व प्रकारच्या चित्रिकरणास परवानगी देण्यात आलेली होती ते सर्व प्रकारचे आदेश रद्द करण्यात येत असुन, यापुढे जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या चित्रपट, लघुपट, वेबसिरीज व सर्व इतर प्रकारच्या चित्रिकरणावर पुढील आदेश होईपर्यंत तात्काळ बंदी घालण्यात येत आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास अथवा टाळाटाळ केल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग नियंत्राण कायदा 1897 अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल.