कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कायदा लागू केला आहे. जिल्ह्यात अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे, त्यामध्ये अत्यावश्यक सेवेत असलेल्या मेडिकल व औषध दुकानात संध्याकाळी ८ नंतर आईसक्रिम, चाॅकलेट व स्नॅक्स विकण्यास मनाई करण्याचा आदेश जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी दिलेला आहे.
जिल्ह्यात हाॅटेल, किराणा दुकान तसेच आईसक्रीम दुकाने रात्री ८ वाजता बंद करण्याचे आदेश आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू केलेली आहे. तरीही काही लोक अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडू शकतात. त्यामुळे मेडिकल व औषधांची दुकाने चालू असतात.
सातारा जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेत असलेल्या मेडिकल व औषधांच्या दुकानात आईसक्रीम, चाॅकलेट तसेच स्नॅकचे पदार्थांची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी आज आदेश काढत मनाई करण्यात आली आहे. तसेच नियमांचे उल्लघंन करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.