कराड : चक्रीवादळानं कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील शेती पिकांच मोठं नुकसान झालं. या वादळाचा फटका सातारा जिल्ह्यातील काही भागांनाही बसला आहे. काही ठिकाणी जनावरांच्या शेडवरील पत्रे उडाले तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. कराड तालुक्यातील चचेगाव येथील तीन शेतकऱ्यांच्या केळीच्या बागांना चक्री वादळाचा फटका बसला असून यात त्यांच्या केळीच्या बागाही भुईसपाट झाल्या. यामध्ये सुमारे 20 लाखांचे नुकसान झाल्याने तीन शेतकरी हवालदिल झाले आहेत. हे पाहून सातरचे खासदार श्रीनिवास पाटील थेट सदर शेतकर्याच्या बांधावर पोहोचले. त्यांनी स्वत: नुकसानीची पाहणी करत पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.
लाखो रुपयांचं कर्ज काढून चार पैस मिळावं म्हणून कराड तालुक्यातही चचेगाव येथील शेतकरी विलास भीमराव पवार, साहेबराव नाना पवार, हनुमंत दाजी हुलवान यांनी आपल्या शेतात केळीची बाग उभी केली. त्याला वर्षभर खतपाणी, कीटकनाशक, औषध फवारणी करून ती मोठी केली. आता हातातोंडाशी आलेली केळीचं पीक विकून पैस मिळणार याची स्वप्ने हे शेतकरी पाहू लागले होते. मात्र, त्यांच्या स्वप्नावर आता पाणी फिरलं आहे. आज खासदार पाटील यांनी सदर केळीच्या बागेला भेट दिली. केळीच्या बागेचे नुकसान पाहून पाटील यांना गहिवरुन आले. सदर शेतकर्याच्या बागेचा तातडीने पंचनामा करुन त्यांना योग्य नुकसान भरपाई द्यावी अशा सुचना खासदार पाटील यांनी प्रशासनाला सुचना दिल्या.
तोंडाशी आलेली केळीची बाग वादळी वाऱ्याने पूर्णपणे भुईसपाट झाली असून सुमारे सात एकर बागेतील किमान 20 लाख रुपयांचे नुकसान झालं आहे. अवघ्या काही दिवसात हि केळी विक्री करण्यास योग्य होणार होती. मात्र वादळी वारे व पावसाने केळीच्या बागेचे मोठे नुकसान झाले. त्याचा मोठ्या प्रमाणात फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या शेतकऱ्यांच्या या बागेतील केळी येत्या पंधरा ते वीस दिवसात विक्रीयोग्य होणार होती.
मात्र, चार दिवसात आलेल्या वादळी वाऱ्याने व पावसाने या केळीच्या बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. वादळी वाऱ्याने केळीचे खुट मोडून पडले असून हातातोंडाशी आलेली केळीची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. प्रशासनाने या केळीच्या बागेच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे.