ढाका : वृत्तसंस्था – बांगलादेशात एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा रस्त्याशेजारी असलेल्या गवतात गोणीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या अभिनेत्रीची निर्घृणपणे हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण बांगलादेश हादरला आहे. या मृत अभिनेत्रीचे नाव इस्लाम शिमू असे आहे. बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका शहरातील एका ब्रिजजवळ तिचा संशयास्पद पद्धतीने मृतदेह आढळून आला होता.
या परिसरातील काही स्थानिक लोकांना सोमवारी सकाळी कदमटोली क्षेत्रात अलीपूर येथे संशयस्पदरित्या एक गोणी आढळली होती. त्या गोणीतून दुर्गंध येत असल्याने नागरिकांनी लगेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी तपास केला असता हा मृतदेह अभिनेत्री रायमा इस्लाम शिमू हिचा असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असता आरोपींनी रायमाला आधी जखमी केलं होतं. त्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या केली होती. त्यानंतर तिच्या मृतदेहाला गोणीत भरुन पूलाजवळ फेकून दिला होता. यानंतर पोलिसांनी मृतदेह मिटफोर्ट रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
रायमा ढाका शहरात ग्रीन रोड परिसरात आपल्या पती आणि दोन मुलांसह राहत होत्या. ती रविवारी सकाळी शूटिंगसाठी घराबाहेर पडली त्यानंतर ती परत आलीच नाही. यानंतर तिला फोन करण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही. आपली आई शूटिंगमध्ये व्यस्त असेल, असं रायमाच्या मुलांना वाटलं होतं. पण आई रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने मुलांनी आपल्या वडिलांसह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रायमाचा मृतदेह मिळाल्यानंतर रायमाचा भाऊ शाहिदुल इस्लाम खोकॉन याने तिचा पती सखावत अमीन नोबोले याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी रायमाच्या पतीसह सहा जणांना अटक करण्यात आली.
पतीनेच काढला काटा
या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या चौकशीत आपण रायमाचा खून केल्याचे कबुल केले. या प्रकरणी पोलिसांनी जी कार ताब्यात घेतली आहे त्याच्या मागच्या सीटवर रक्ताचे डाग आढळून आले. घरगुती वादांमुळे आपण तिची हत्या केल्याचं तिच्या पतीने कबूल केलं आहे. तसंच या खुनात ड्रायव्हरचाही सहभाग होता असेदेखील त्याने कबुल केले आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी रायमाचा पती आणि त्याचा ड्रायव्हर अशा दोघांना अटक केली आहे.
रायमा इस्लाम शिमू यांची कारकीर्द
रायमाच्या अभिनय क्षेत्रातील आपल्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलेलं आहे. तसेच तिने अनेक नाटकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. तिने 1998 साली ‘बार्तामान’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. तसेच रायमाने आतापर्यंत एकूण 25 चित्रपटांमध्ये काम केलं आहे.