नवी दिल्ली । बँक कर्मचाऱ्यांच्या 9 संघटनांची सर्वोच्च संस्था असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने 16 आणि 17 डिसेंबर 2021 रोजी दोन दिवसीय संपाची घोषणा केली आहे. युनायटेड फोरमने देशव्यापी संपाची हाक दिली आहे. दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रस्तावित खाजगीकरणाच्या विरोधात हा संप जाहीर करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत स्टेट बँक ऑफ इंडियासह देशातील सर्व बँका आज आणि उद्या बंद राहणार आहेत.
‘या’ दोन बँकांचे खाजगीकरण केले जाहीर
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना 1.75 लाख कोटी रुपये उभारण्याच्या निर्गुंतवणुकीच्या उद्दिष्टांतर्गत दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण करण्याची घोषणा केली. यापूर्वी 2019 मध्ये, सरकारने IDBI बँकेतील आपला बहुसंख्य हिस्सा LIC ला विकून IDBI बँकेचे खाजगीकरण केले होते.
चार वर्षांत 14 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण
गेल्या चार वर्षांत सार्वजनिक क्षेत्रातील 14 बँकांचे विलीनीकरण करण्यात आले आहे. सरकारने बँकिंग कायदा (सुधारणा) विधेयक, 2021 संसदेच्या चालू अधिवेशनात सादर करण्यासाठी आणि पारित करण्यासाठी लिस्ट केले आहे.
SBI ने संपावर न जाण्याचे आवाहन केले होते
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करून आपल्या कर्मचाऱ्यांना संपावर न जाण्याचे आवाहन केले आहे. बँकेने म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे संबंधितांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. SBI नेही बँक युनियनला चर्चेचे आमंत्रण पाठवले होते, मात्र बँक कर्मचारी ठाम राहिले.
सेंट्रल बँक ऑफ इंडियानेही आपल्या कर्मचारी आणि युनियनना पत्र लिहून त्यांच्या सदस्यांना बँकेच्या भल्यासाठी काम करण्यास सांगितले आहे. पंजाब नॅशनल बँकेने (PNB) ट्विटद्वारे कर्मचाऱ्यांना संपावर न जाण्याचे आवाहनही केले आहे.