हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र आणि कर्नाटकमधला सीमावाद प्रश्नावर समन्वय साधण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील हे आज बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा लांबवणीवर टाकण्यात आला आहे. या दरम्यान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज पुन्हा महाराष्ट्रातील मंत्र्यांवर टीकास्त्र डागले आहे. कर्नाटक सीमेच्या संरक्षणासाठी आम्ही समर्थ आहोत. संविधानानुसार सीमाप्रश्नी आमचा विजय निश्चित आहे. मात्र, महाराष्ट्रातील मंत्री जाणीवपूर्वक कर्नाटक व महाराष्ट्रातील संबंध बिघडवत आहेत, असा आरोप बोम्मई यांनी केला आहे.
बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकात माध्यमांशी संवाद साधत टीका केली. यावेळी ते म्हणाले की, आम्हाला विश्वास आहे कि कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नी आमचा विजय होईल. कारण आमचा संविधानावर विश्वास आहे. महाराष्ट्र व कर्नाटक मधील सीमावाद प्रश्न हा आजचा नाही. तर तो बऱ्याच वर्षांपासूनचा आहे. आमच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत, असे बोम्मई यांनी म्हंटल आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी यापूर्वीही महाराष्ट्र सरकारला कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी गंभीर इशारा दिला होंता. त्यानंतर काल महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये येणाऱ्या मंत्र्यांवर त्यांनी बंदी घातली. दरम्यान आज बोम्मई यांनी पुन्हा टीका केल्यामुळे त्याला शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री काय उत्तर देणार? हे पहावे लागेल.