वाईच्या ससाणेकडून माझी 20 लाखांची फसवणूक : अभिनेते सयाजी शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
अभिनेते सयाजी शिंदे यांची फसवणूक करून त्यांचीच बदनामी केल्याप्रकरणी वाई येथील सचिन बाबूराव ससाणे (रा. फुलेनगर- वाई) याच्याविरूध्द कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सचिन ससाणे याने फसवणूक केली असून धमकी देणे, अर्थिक नुकसान व बदनामी केलेबाबतचा तक्रार अर्ज सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख यांना देण्यात आल्याची माहिती अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिली आहे.

सयाजी शिंदे यांच्या वतीने देण्यात आलेल्या अर्जात म्हटले आहे की, सचिन ससाणे यांनी गिन्नाड या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी माझ्याशी संपर्क साधला होता. या बदल्यात त्यांनी 25 लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. पाच लाख रुपये त्यांनी दिल्यानंतर ऑक्टोबर 2022 मध्ये मी तीन दिवस त्या चित्रपटासाठीचे काम केले. कामादरम्यान श्री. ससाणे यांना चित्रपट दिग्दर्शनाचे पुरेसे ज्ञान नसल्याचे तसेच त्यांचे आर्थिक नियोजन बरोबर नसल्याचे समोर आले. यामुळे चित्रपटाच्या निर्मितीच्या कामकाजात वेळोवळी अनेक अडचणी आल्या. यानंतर मी त्यांना आवश्यक ते बदल करण्याचे तसेच ते झाल्यानंतर पुढील चित्रीकरण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांच्याकडून कोणतेही नियोजन झाले नाही.

श्री. ससाणे यांच्यामुळे मला इतर चित्रपटांसाठीच्या चित्रिकरणासाठी वेळ देता आला नाही व त्यात माझे सुमारे 50 लाखांचे नुकसान झाले. ठरल्यानुसार चित्रीकरणांचे उर्वरित 20 लाख रुपये द्यावे लागू नयेत, यासाठी श्री. ससाणे यांच्याकडून माझ्याविरोधात नाहक तक्रारी अर्ज करण्यात येत आहेत. ठरलेल्या व्यवहारापोटीची उर्वरित रक्कम देणे लागू नये, यासाठीचा श्री. ससाणे यांचा हा खटाटोप सुरू असल्याचेही श्री. शिंदे यांनी तक्रार अर्जात नमूद केले असून त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेण्याची विनंतीही करण्यात आली. याच अनुशंगाने श्री. शिंदेच्या वतीने अब्रुनुकसानीच्या कारवाईची नोटीसदेखील सचिन ससाणे यांना पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.