औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. कोरोना शहरातून ग्रामीण भागातही पसरला होता. प्रशासनाकडून लॉकडाऊन लावल्यानंतर कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली होती मात्र नियम शिथिल केल्यामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 115 नवीन रुग्ण आढळल्याने चिंता अजूनच वाढली आहे.
कोरोना पळवून लावण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक दे चेन’ मोहीम सुरु करून कडक निर्बंध लावले होते. आता हळू-हळू कोरोना कमी होत होता. परंतु आता पुन्हा ही रुग्णसंख्या वाढायला लागली आहे. त्यामुळे कोरोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
बुधवारी शहरात 8 आणि ग्रामीण भागात 51 रुग्ण आढळून आले आहे. कोरोनाची रुग्ण संख्या अत्यंत कमी झाल्याने जिल्हा कोरोनामुक्त होईल असे वाटत होते. परंतु दुसऱ्या दिवशी 59 वरून ही संख्या 115 वर पोहोचली आहे.
गुरुवारी शहरात 26 तर ग्रामीण भागात 89 रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर काल शंभर जणांना सुट्टी देण्यात आली. गुरुवारी दोघांचा मृत्यू झाल्याने एकूण मृत्यूची संख्या 3406 झाली आहे. सध्या विविध रुग्णालयात 905 रुग्णांवर उपचार सुरू असून घाटीत गारखेडा येथील 45 वर्षे पुरुषाचा तर खासगी रुग्णालयात शेवता येथील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.