फलटण | फलटण तालुक्यात ग्रामसेवक पदावरती काम करणाऱ्या एका महिलेचा विनयभंग एका सहकारी ग्रामसेवकाने करत शिवीगाळ करुन मारहाण प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 22 रोजी सायंकाळी 5. 30 वाजण्याच्या सुमारास मौजे गोळेवाडी (ता. फलटण) गावच्या हद्दीत ग्रामपंचायत कार्यालय गोळेवाडी येथे राजाराम शंकर ढोक ताथवडा गावचे ग्रामसेवक याने फिर्यादी ग्रामसेवक महिलेचा हात धरून फिर्यादी ग्रामसेवक महिलेला तू मला फार आवडतेस, तू माझी झाली पाहिजे असे म्हणून फिर्यादी महिलेस जवळ ओढून शिवीगाळ करून हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण करून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. फिर्यादी ही त्यावेळी तिचे पतीस फोन करीत असताना फिर्यादीचा मोबाईल घेऊन जमिनीवर आपटून मोबाईल तोडून त्याचे नुकसान केले. याबाबत कोणाला काहीही सांगू नको, असे म्हणून फिर्यादी ग्रामसेवक महिलेला खुर्चीवर जोरात ढकलले व त्यामुळे तेथील खुर्ची तुटून त्या खुर्चीचे तुटलेल्या पायाच्या साह्याने डोक्यावर हातावर मांडीवर मारहाण केली.
याप्रकरणी राजाराम शंकर ढोक (ताथवडा गावचे ग्रामसेवक रा. वाठार निंबाळकर ता. फलटण हल्ली, रा. लक्ष्मी नगर) यांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अरगडे करीत आहेत.