सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सिनेअभिनेते अमीर खान अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेतात. अमिरने ‘सत्यमेव जयते’च्या माध्यमातून पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्नही मार्गी लावला आहे. दरम्यान आज अमीर खानच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील एका सर्व सुविधानियुक्त अशा एका हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्याने लोकांनी सामाजिक कार्यात सर्वांनी सहभाग घेण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली.
सातारा जिल्ह्यातील वाई येथे इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्यावतीने बेल एअर हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. या हॉस्पिटलचे खासदार श्रीनिवास पाटील, सिनेअभिनेते अमीर खान यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
यावेळी अमीर खान म्हणाला की, मला खूप आनंद होत आहे की मी वाई येथे येऊन येथील सामाजिक कामाचा एक भाग झालो. बेल एअर हॉस्पिटल व गॉडफादर टॉमी करियलकुलम यांनी प्रयत्न केले आहेत कि एक उत्तम दर्जाच्या सुविधा असणारे हॉस्पिटल व्हावे. या हॉस्पिटलमुळे येथील नागरिकांबरोबर पर्यटकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप मोलाचे काम केले आहे. मला पूर्ण टीमचे धन्यवाद मानतो. अशा सामाजिक कार्याच्या गोष्टींमध्ये आपण प्रत्येकाने सहभागी व्हायला पाहिजे.
यावेळी खा. पाटील म्हणाले, वाई येथे नव्याने सुरू होणाऱ्या बेल एअर हॉस्पिटल मुळे वाई व महाबळेश्वर या डोंगरी तालुक्यातील नागरिकांना अत्याधुनिक अशी आरोग्य सेवा मिळणार आहे. बेल एअर हॉस्पिटल महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम अशा ठिकाणी जाऊन आरोग्य सेवा देत आहे. इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे आरोग्य क्षेत्रातील काम खूप चांगल्या प्रकारे चालू आहे .या पुढील काळातही बेल एअर हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मोफत चांगले उपचार देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विविध संस्थांच्या मदतीमधून वाई येथील बेल एअर हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना अत्याधुनिक पद्धतीने उपचार केले जाणार आहेत. बेल एअरचे आरोग्य क्षेत्रातील काम पाहता पुढेही अशाच प्रकारे काम करतील, असा विश्वास जिल्हाधिकारी जयवंशी यांनी व्यक्त केला.