हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बेळगांव लोकसभा पोटनिवडणुकीचा निकालांची उत्सुकता (2 मे) सकाळपासूनच काॅंग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांच्यात दिसून येत होती. केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली आहे. यात भाजपतर्फे सुरेश अंगडींच्या पत्नी मंगला अंगडी तर काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी रिंगणात आहेत. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून अंगडी आणि जारकीहोळी यांच्यामध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. अखेर या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपाच्या मंगला अंगडी या 1622 मतांनी विजय मिळविला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मैदानात उतरलेले 26 वर्षांचे शुभम शेळके, भाजपतर्फे मंगला अंगडी तर काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी यांच्यात तिरंगी लढत होईल असे वाटत होते. परंतु शुभम शेळके हे पूर्णपणे निष्प्रभ ठरले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी शिवसेना ताकदीनिशी उतरली होती, तर भाजपच्या प्रचारासाठीही दिग्गज नेत्यांची फौज बेळगावात आली होती. त्यामुळे या निवडणुकीकडे शिवसेना विरुद्ध भाजप असे पाहिले जात होते. परंतु अनपेक्षितपणे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी रंगत निवडणुकीत आली आहे.
बेळगांव लोकसभा पोटनिवडणूकीसाठी 18 लाख 13 हजार 567 मतदारापैकी 10 लाख 16 हजार 25 मतदारांनी मतदान केले होते. बेळगावसह कर्नाटकातील 15 पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. शेवटी अटीतटीच्या लढतीत भाजपाच्या मंगला अंगडी यांनी 1 हजार 622 मतांनी विजय मिळवला.