कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यातील खुर्द येथील बेलवडे विकास सेवा सोसायटी निवडणूकीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बेलजाईदेवी परिवर्तन पॅनेलने सत्ताधारी राष्ट्रवादीच्या माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या 20 वर्षाच्या सत्तेचा अक्षरशः धुव्वा उडवून 12 पैकी 11 जागा जिंकून सत्तांतर घडविले.
पाटण तालु्क्यातील बेलवडे खुर्द विकास सेवा सोसायटीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बेलजाईदेवी परिवर्तन पॅनेलने सत्तांतर करून आपला झेंडा फडकवला. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या या लढतीत सत्ताधारी पाटणकर गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बेलजाईदेवी परिवर्तन पॅनेलचे उमेदवार विजया बबन पवार, अलका बंडू पाटील, गोविंद गणपती कांबळे, यशवंत केशव कवर, अधिक यशवंत पवार, आनंदा विष्णू पवार, बंडू नथुराम पवार, शामराव रामचंद्र सोनार, राजाराम श्रीपती पवार, राजेंद्र निवृत्ती पवार, हणमंत खाशाबा पवार हे विजयी झाले आहेत. निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
सर्व विजयी उमेदवारांचे मंत्री शंभूराज देसाई, रविराज देसाई, यशराज देसाई यांनी अभिनंदन केले. दरम्यान सत्ताधारी पाटणकर गटाच्या बेलजाईदेवी ग्रामविकास पॅनेलचे बबन पांडूरंग पवार हे केवळ एक उमेदवार या निवडणूकीत विजयी झाले.
वीस वर्षानंतर पाटणकर गटाला भगदाड..!
बेलवडे विकास सेवा सोसायटीवर गेल्या 20 वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षाचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या गटाची तब्बल 20 वर्षे सत्ता होती. मात्र यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना आणि मनसे या दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बेलजाईदेवी परिवर्तन पॅनेलने 12 पैकी 11 जागावर दणदणीत विजय मिळवून विरोधी पाटणकर गटाच्या 20 वर्षाच्या सत्तेला भगदाड पाडून सत्तांतर केले.