मुंबई । लॉकडाऊनच्या काळात भरमसाठ वीज बिलांमुळे आर्थिक बोजा पडलेल्या सामान्य ग्राहकांना ‘बेस्ट’ने मोठा दिलासा दिला आहे. या ग्राहकांकडून आकारण्यात आलेली वीज बिलाची जास्तीची रक्कम त्यांना व्याजासहित परत केली जाईल. वसूल केलेली अतिरिक्त रक्कम संबंधित ग्राहकाच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याचे ‘बेस्ट’कडून सांगण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
गेल्या काही दिवसांमध्ये बेस्ट, महावितरण, अदानी अशा सर्वच वीज कंपन्यांनी ग्राहकांना वीजेची भरमसाठ बिले पाठवली होती. प्रत्यक्ष वीज वापरापेक्षा जास्त बिल आल्याने अनेकजण संतापले होते. याविरोधात मध्यंतरी महावितरणच्या कार्यालयात निदर्शनेही झाली होती. परंतु, उर्जामंत्री नितीन राऊत आणि वीज कंपन्यांकडून वाढीव वीज बिलांचे समर्थन करण्यात आले होते. त्यामुळे लॉकडाऊनमुळे अगोदरच आर्थिक चणचणीत असलेल्या सामान्य लोकांची चिंता वाढली होती.
मात्र, आता किमान ‘बेस्ट’च्या वीज ग्राहकांना तरी वीज बिलाच्या आर्थिक बोज्यापासून दिलासा मिळणार आहे. ‘बेस्ट’ने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेतल्यानंतर जादा बिलाची रक्कम परत दिली जाईल. परंतु, अंदाजित बील कमी आलेल्यांकडून प्रत्यक्ष वीज वापरानुसार रक्कम आकारली जाईल. तसेच १५ जूनपासून रेडझोन वगळता इतर भागात मीटर रीडिंग घेण्याचे काम सुरू होईल, असेही बेस्ट प्रशासनाने सांगितले.त्यामुळे आता महावितरण, अदानी पॉवर आणि टाटा पॉवरही बेस्टचा कित्ता गिरवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”