विश्वासघात : अनैतिक संबंधांच्या रागातून वर्गमित्रानेच मित्राचा खून केल्याची कबुली

0
53
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कराड-पुसेसावळी मार्गावर वाघेरी फाटा येथे तलवारीने वार करुन भाजी विक्रेत्याचा शनिवारी रात्री खून करण्यात आला होता. अनैतिक संबंधाच्या रागातून चिडून जाऊन वर्गमित्रानेच त्याच्या तीन साथीदारांसमवेत हे कृत्य केल्याचे उघडकीस आले असून विश्वासघात केल्याच्या रागातून मित्राला संपविल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी चौघांना अटक करून सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

दिपक ऊर्फ बाळकृष्ण शरद इंगळे (वय 38), संदीप सुभाष इंगळे (40, दोघेही रा. आर्वी, ता. कोरेगाव), आप्पा ऊर्फ सागर धनाजी इंगळे (वय 28) व गणेश विठ्ठल भोसले (वय 23, दोघेही रा. कारंडवाडी, ता. सातारा) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. रमेश रामचंद्र पवार (वय 40, रा. आर्वी, ता. कोरेगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आर्वी येथील रमेश पवार हा शनिवारी रात्री गावातीलच काहीजणांसोबत पिकअप जीपमधून भाजीपाला खरेदीसाठी कराडला आला होता. भाजीपाला खरेदी करुन रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण परत आर्वीला जात असताना वाघेरीफाटा येथे पाठीमागून जीपमधून आलेल्या दिपक इंगळे याच्यासह त्याच्या साथिदारांनी त्यांना गाडी आडवी मारली. रमेशच्या डोळ्यात मिरचीपुड टाकून त्यांनी त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच तलवारीने वार करुन निर्घृण खून केला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस नाईक सज्जन जगताप, शशिकांत काळे, अमित पवार व उत्तम कोळी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. तपासातून उघड झालेल्या माहितीनुसार, आरोपी सातार्‍यानजीक एमआयडीसी परिसरात फिरत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक तातडीने त्याठिकाणी पोहोचले. या पथकाने दिपक इंगळे व त्याचा चुलत भाऊ संदीप इंगळे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन आप्पा ऊर्फ सागर इंगळे व गणेश भोसले या दोघांना पाठलाग करुन सातारा एमआयडीसी चौकातून ताब्यात घेण्यात आले. चौघांनाही सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here