हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस चांगलाच वादळी ठरला आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटामध्ये जोरदार घोषणाबाजी होऊन त्याचे रूपांतर धक्काबुक्कीत झालं. या राड्या नंतर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला आहे. अंगावर याल तर शिंगावर घेऊ अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना भरत गोगावले म्हणाले, त्यांनी आम्हाला धक्काबुक्की नाही केली, आम्ही त्यांना धक्काबुक्की केली. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आम्ही डरपोक नाहीत. कोणी जर आम्हांला पाय लावणार असेल तर आम्हीही सोडणार नाही, कोणी अंगावर आलं तरआम्ही शिंगावर घेऊ असा थेट इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, या राड्यावेळी बंडखोर आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. यावेळी आ. महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार आ. मिटकरी यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. या एकूण संपूर्ण प्रकरणामुळे विधानभवन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं.