हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारतरत्न प्राप्त स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले. हि बातमी अत्यंत धक्कादायक असून संपूर्ण जगभरात शोकमय वातावरण निर्माण झाले. यानंतर जगभरातून लता मंगेशकर यांच्या चाहत्यांनी अक्षरशः टाहो फोडला. गेल्या २९ दिवसांपासून लता दीदींची न्यूमोनियासोबत झुंज सुरु होती. हि झुंज आज अपयशी झाली आणि लता दीदींनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर अगदी काहीच क्षणापुर्वी मुंबईतील शिवाजी पार्क येथे लता दीदींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले आणि दीदी अनंतात विलीन झाल्या. लता दीदींच्या अंतिम दर्शनासाठी त्यांच्या चाहत्यांनी शिवाजी पार्कवर मोठी गर्दी केली होती. साश्रू नयनांनी प्रत्येकाने लता दीदींना निरोप दिला. याठिकाणी अनेक दिग्गज कलाकार आणि नेते मंडळी उपस्थित होते.
रविवारी सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी लता दिंडीचे ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. यानंतर दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास लता दीदींचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी प्रभुकुंज येथे अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दीदींचे पार्थिव प्रभुकुंज येथून शिवाजी पार्क येथे सर्व सामान्यांना अंत्य दर्शन घेता यावे यासाठी नेण्यात आले. याठिकाणी दीदींच्या अनेक चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तर दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी तेथे दिग्गज नेतेमंडळी यांच्यासह कलासृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. मंगेशकर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर दीदींच्या नसण्याचे दुःख स्पष्ट दिसत होते. तर लता दीदींच्या अंतिम दर्शनासाठी उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य नेत्यांच्या चेहऱ्यावरदेखील दुःखद भाव स्पष्ट दिसत होते.
लता दीदी यांची विशेष बाब म्हणजे, वयाच्या तेराव्या वर्षी वडील दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले. अशावेळी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेताना त्यांनी स्वतःच्या आयुष्याचा विचार कधीच केला नाही. लता दीदींचे वय फारसे नव्हते पण खांद्यांमध्ये कुटुंबाची जबाबदारी पेलता येईल इतके बळ सामावलेले होते. लता दीदींनी आपल्या चारही भावंडांचा व्यवस्थित सांभाळ केला. कुटुंबासाठी त्यांनी लग्नदेखील केले नाही. त्यांनी नेहमीच आपल्या कुटुंबाची पाठराखण केली. इतकेच नव्हे तर लता दीदींचे स्वर जितके मधुर तितकीच मधुर त्यांची वाणी होती. लता दीदींचे प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे संबंध होई. त्यामुळे आज लता दीदींचे हयात नसणे हि बाब सर्वांच्याच जिव्हारी लागली आहे.