बाळासाहेबांमुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान, नाहीतर…; भास्कर जाधवांची भाजपावर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या घणाघाती भाषणानंतर शिवसेना आणि भाजपमधील वाद वाढला आहे. यानंतर शिवसेनेचे फायरब्रँड नेते भास्कर जाधव यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळेच मोदी आज पंतप्रधान आहेत, बाळासाहेब ठाकरे तेव्हा मोदींच्या पाठीशी उभे राहिले नसते तर मोदींचं अस्तित्व केव्हाच संपलं असतं’ अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

गुजरात दंगलीनंतर नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री पदावरून काढून टाकण्याच्या निर्णयासाठी  लालकृष्ण अडवाणी बाळासाहेबांना भेटायला आले. बाळासाहेबांनी वाटेल ते झाले तरी चालेल नरेंद्र मोदींना बदलायचे नाही असे म्हटले. बाळासाहेबांमुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत नाहीतर त्या दिवशीच घरी गेले असते. बाळासाहेबांचे फोटो लावून तुम्ही तुमचा पक्ष वाढवलात,” असे भास्कर जाधव म्हणाले.

हे भाजपावाले शिवसेनेचे बोट धरून आज महाराष्ट्रात मोठे झाले. शिवसेना प्रमुखांमुळे देशामध्ये भाजपा मोठी झाली आहे. सोशल मिडीयावर आमच्या नरेंद्र मोदींचा फोटो लावून शिवसेनेवाले निवडणून आले म्हणून सांगतात. कोण नरेंद्र मोदी? १९८४ साली महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसोबत युती केली तेव्हा फक्त बाळासाहेबांच्या फोटोवर तुम्ही मोठे झालात, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.

शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचाही भास्कर जाधव यांनी आज समाचार घेतला. ‘ज्यावेळी सरकार बनत नव्हते त्यावेळी 86 तासांचं राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत सरकार कोणी बनवलं ?  भाजपनेच ना? मग कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपला?  तीन पायाचं सरकार म्हणून महाविकास आघाडीला हिणवणाऱ्या भाजपसोबत आज जे घटक आहेत त्यांनी भाजपचं हिंदुत्व स्वीकारलं आहे का? हे सांगावं, असा थेट सवाल जाधव यांनी फडणवीसांना विचारला.