हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधिमंडळ अधिवेशनाच्या आज तिसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा जोरदार कलगीतुरा रंगला. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे सरकारने घेतलेल्या थेट नगराध्यपद निवड प्रक्रियाला विरोध दर्शवत संभागृहात सरकारवर जोरदार शब्दात टीका केली. यावेळी भास्कर जाधव बोलत असतानाच मंत्री शंभूराज देसाई आणि त्यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाव जरी शिवसेनेचं घेत असले तरी सगळं कार्यक्रम मात्र भाजपचा राबवत आहेत. त्यांनी स्वतः मानाने घेतलेला एक निर्णय सांगावा असं आव्हान भास्कर जाधव यांनी दिले. तुमच्या कडून भाजपवाले तुम्हीच घेतलेले निर्णय बदलून घेत आहेत त्यामुळे सावध रहा. कारभार करायचा तर स्वाभिमानाने करा, गरज फक्त तुम्हालाच नाही तर भाजपला पण आहे. सत्तेसाठी ते पण माशा सारखे तडफडत होते असं म्हणत भास्कर जाधव यांनी शिंदे – भाजप सरकारवर निशाणा साधला.
त्यावेळी खाली बसून बोलणाऱ्या शंभूराज देसाई यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. शंभूराजे किमान स्वतःच्या मनाला विचारा आणि असं प्रत्येक गोष्टीत तोंड घालून स्वतःचे हसे करून घेऊ नका असं भास्कर जाधव म्हणाले. यानंतर काय काय असं म्हणत शंभूराजे यांनी उलट सवाल करताच भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा त्यांचा समाचार घेतला. ‘काव काव काय करतोय, पितृपक्ष येत असेल म्हणून प्रॅक्टिस करत आहे का? असं म्हणत मी पितृपक्षात माझ्या आई-वडिलांना वाडी ठेवताना काव काव म्हणतो, नाहीतर मला तुमच्यासाठी वाडी ठेवण्याची वेळ आणू नका अशा शब्दात इशारा दिला. त्यावर तुम्ही जे निर्णय घेतले नव्हते ते निर्णय आम्ही घेतले असं शंभूराज यांनी म्हणताच हा तर निर्लज्ज पणाचा कळस आहे अशा शब्दात भास्कर जाधव यांनी आपला संताप व्यक्त केला.