राम मंदिराचे भूमिपूजन राजीव गांधींच्या काळात; शरद पवारांचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अयोध्येतील राम मंदिराचा (Ram Mandir Ayodhya) शिलान्यास माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात झाला. त्यानंतर काही लोक कोर्टात गेले आणि राम मंदिराबाबत निकाल आता आला आणि मंदिर तयार झालं असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे. बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील उत्तम पाटील आणि रावसाहेब पाटील यांच्या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी पवारांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर (Narendra Modi)  निशाणा साधला.

शरद पवार म्हणाले, अयोध्येचा श्रीराम, हनुमान यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण अयोध्येतील मशीद पडल्यानंतर इथं राम मंदिर बांधण्याबाबतचा निर्णय राजीव गांधी यांच्या वेळी झाला. त्यांच्या काळातच राम मंदिराचा शिलान्यास पार पडला. नंतर काही लोक कोर्टात गेले, खूप वर्षांनी आता निकाल आला आणि मंदिर तयार होत आहे. परंतु आता भाजप आणि आरएसएस याचा मतासाठी फायदा करून घेत आहेत, धार्मिकतेच्या राजकारणाचा वापर केला जात आहे असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर टीका केली.

मोदींच्या उपवासावरूनही पवारांनी लगावला टोला –

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 दिवस उपवास करणार आहेत. यावरूनही पवारांनी मोदींना टोला लगावला आहे. मोदींच्या भावनेचा मी आदर करतो, पण देशातील गरिबी हटवण्यासाठी सुद्धा असा कार्यक्रम सरकार हाती घेईल का? असा सवाल शरद पवारांनी केला आहे. तसेच मोदी राम मंदिरासाठी 10 दिवस उपवास करत आहेत तसाच उपवास त्यांनी देशातील लोकांची उपासमार घालवण्यासाठी करावा, असा सल्ला सुद्धा शरद पवारांनी मोदींना दिला आहे.

शरद पवारांनी सरकारच्या शेतकऱ्यांच्या बद्दलच्या धोरणावरही बोट ठेवलं. ते म्हणाले, मी देशाचा कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलं होते. परंतु सध्याच्या सरकारला शेतकऱ्यांची आस्था नाही. या देशात उद्योगपतींची कर्ज माफ होतात. पण शेतकऱ्यांची कर्ज माफ होत नाही. देशात चुकीची आर्थिक धोरण राबवली जात आहेत. अशी चुकीची धोरणं करणाऱ्या लोकांना बाजूला केलं पाहिजे असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.