नाशिक प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा झालेला दारुण पराभव आणि स्वतःच्या मतदारसंघात शिवसेनेचा वाढलेला दबदबा बघून छगन भुजबळ आपला मतदासंघ बदलण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघाऐवजी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघातून छगन भुजबळ विधानसभेची निवडणूक लढतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
बेहुशोबी मालमत्तेच्या कारणाने छगन भुजबळ हे तुरुंगात होते. ते सध्या आरोग्याच्या कारणामुळे जामिनावर बाहेर आहेत. मात्र ते ज्या काळात तुरुंगात होते. त्यावेळी शिवसेनेने त्यांचा अभेद्य येवल्याचा बालेकिल्ला खिळखिळा केला. येवला नगरपरिषदेवर भगवा फडकवत जिल्हा परिषदेच्या ५ पैकी ३ जागा देखील शिवसेनेने बळकावल्या. त्यामुळे छगन भुजबळ येवल्यातून विधानसभा लढण्यास कतरत आहेत. म्हणून त्यांनी या विधानसभा निडणुकीला मतदारसंघ बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघ छगन भुजबळ यांना सुरक्षित वाटत आहे. कारण या मतदारसंघात ओबीसी मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे छगन भुजबळ या मतदारसंघातून लढू शकतात. परंतु याबद्दल छगन भुजबळ यांनी कसलीही पुष्टी दिली नाही मात्र येत्या काही दिवसात येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि छगन भुजबळ यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ऐन निवडणुकीच्या काळात हा धक्कादायक बदल बातम्यांच्या मुख्यप्रवाहात येण्याची शक्यता आहे.