हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दादांनी पक्ष फोडला. ज्यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू घेतले त्या काकांच्याच वर्चस्ववाला नख लावत राष्ट्रवादीची वेळ चोरली. वयाच्या 84 व्या वर्षी देखील शरद पवारांनीही (Sharad Pawar) सर्वात मोठा धक्का पचवत आपल्या पुतण्याला कडवं आव्हान उभं केलंय. दादा की साहेब याचा खरा निकाल हा लोकसभेच्या निवडणुकीनंतरच लागणार, हे तर फिक्स झालंय. मात्र त्याआधीच अजितदादांच्या (Ajit Pawar) पायाखालची वाळू सरकेल, अशी एक गोष्ट घडलीय. महाराष्ट्राच्या राजकारणात कुणाला आमदार, खासदार करायचं? ही ठरवण्याची धमक आपल्यात असल्याचा दावा जे अजितदादा करतात त्याच दादांच्या पक्षाला लोकसभेत भोपळा मिळणार असून अगदी कमी दिवसात तुतारी फुंकून शरद पवार प्रतिष्ठेच्या पाचही जागा जिंकणार, असा एक अहवाल नुकताच समोर आलाय.
अजितदादांनी बंड करत पक्षातील पहिल्या फळीतील नेते कार्यकर्ते पळवले. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर क्लेम केला आणि ते मिळवले देखील. शरद पवारांना मात्र नव्या नावासह हातातील घड्याळ सैल करत हाती तुतारी घ्यावी लागली. खरी राष्ट्रवादी आपलीच, हे जर दाखवून द्यायचं असेल तर दोन्ही पवारांना लोकसभेला जास्तीत जास्त खासदार निवडून आणावे लागतील. यासाठीच दोन्ही नेते, कार्यकर्ते पायाला भिंगरी बांधून फिरतायत. निवडणुकीतील अजितदादांच्या या आक्रमक राजकारणाला शरद पवार मात्र पुरून उरतील, हे परसेप्शन गडद व्हायला अजून एक कारण जबाबदार आहे. लोकसभेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील निकालाचं चित्र काय असेल याचा सी व्होटरने केलेला सर्वे नुकताच प्रसिद्ध झालाय. यामध्ये शरद पवार पश्चिम महाराष्ट्रातील पाचच्या पाच जागा दणक्यात जिंकणार असून जितेंद्र आव्हाडांच्या भाषेत, पवारांच्या पक्षावर डाका टाकणाऱ्या अजितदादांच्या नशिबी मात्र भोपळाच दिसतोय. सी व्होटर्सनं वर्तवलेलं हे भाकीत खरं ठरलं तर अजितदादांनी घेतलेल्या पॉलिटिकल रिस्कची मेहनतही शून्यात जाऊ शकते.
राष्ट्रवादीचा वारसा हे फक्त शरद पवार आणि त्यांनी ठरवलेला वारसदारच पुढे घेऊन जाऊ शकतो, असा मेसेजही या निकालातून समोर येईल. सर्वेनुसार निकालही जैसे थे राहिला तर, तेल लावलेल्या पैलवानानं आपल्याच विरोधात दंड थोपटलेल्या अजितदादांना मात दिली, हे क्लिअर होऊ शकतं. आणि अजित दादांच्या बंडाबद्धल सर्वसामान्यांच्या मनात कमालीची चीड आहे, हे देखील समोर येईल. पक्षाचा बेस, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि कनेक्ट तुटलेला असतानाही नवीन चिन्ह घेऊन शरद पवारांचीच तुतारी दादांच्या घड्याळासमोर भाव खाताना दिसतेय. पश्चिम महाराष्ट्रातल्या पाचही जागांवर शरद पवारांचीच कशी चलती आहे? ते आधी पाहू…
शरद पवार राजकारण करतात ते पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार पट्ट्यात. या भागानंच शरद पवारांना राजकारणात जिवंत ठेवलं. त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे या भागातील अनेक इस्टॅब्लिश चेहरे राष्ट्रवादीला सोडून गेलेले असताना शरद पवारांचं इथं पानिपत होणार, असा कयास बांधला जात असताना याच पट्ट्यात पवार जोरदार मुसंडी मारताना दिसून येत आहेत. बारामती, माढा, सातारा, शिरूर आणि दक्षिण नगर या पाचही अटीतटीच्या लढतीत शरद पवार यांना जनतेनं कौल दिल्याचं किमान एक्झिट पोलमधून समजतंय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतः आपल्या पत्नीला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामतीतून निवडणुकीच्या मैदानात उतरवलेलं असताना ही घरची जागाही अजितदादांच्या हातून निसटताना दिसतेय.
बारामतीची सीट निवडून आणण्यासाठी अजित दादा आणि त्यांची यंत्रणा 24 तास काम करतेय. शरद पवार, सुप्रिया सुळे यांना टार्गेट करत अजित दादांनी बारामतीचा प्रचारही टीपेला नेऊन ठेवलाय. बारामती, इंदापूर या विधानसभा मतदारसंघावर मिळणाऱ्या लीडच्या जीवावर सुप्रिया सुळे खासदार होतात. आपण यंत्रणा फिरवायचो म्हणून ताई खासदार व्हायच्या, अस ज्या आत्मविश्वासाने दादा बोलायचे. तीच जागा निकालात निघाल्यावर अजितदादांसाठी ही मोठी खच्चीकरण करणारी गोष्ट ठरू शकते.
पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या दुसऱ्या जागेवर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. तो लोकसभा मतदारसंघ म्हणजे शिरूर. शिरूरचे स्टॅंडिंग खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांसोबत असणारी निष्ठा कायम ठेवली. कोल्हेंना निवडून आणण्यासाठी दिलीप वळसे पाटील आणि आपण जिवाचं रान केलं, असं दादांचं म्हणणं होतं. त्यामुळे पक्ष फुटीच्या वेळेस कोल्हे आपल्या पाठीशी आले नाहीत, याचा कदाचित राग मनात ठेवून अजितदादांनी शिरूरची जागा ही प्रतिष्ठेची केली. कोल्हेंना यंदा आपण घरी बसवणार, अशी थेट पब्लिक स्टेटमेंटही त्यांनी केली. कोल्हे यांना टक्कर देण्यासाठी आढळराव पाटलांच्या हातातून धनुष्यबान खाली ठेवत त्यांना घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवायला लावलंय. दादांचा शब्द अंतिम मागणाऱ्या या मतदारसंघातील आमदारांची ताकद, वळसे पाटील यांना मानणारा वर्ग, आढळरावांची पारंपारिक व्होटबँक आणि महायुतीची एकत्रित ताकद अशी बेरीज करून पाहता आढळरावांचं वजन वाढताना दिसतं. मात्र अमोल कोल्हे यांचीच निवडणुकीत सरशी होणार असल्याचं एक्झिट पोलमधून समोर आल्यानं राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा या दोन्ही लढती अजितदादांच्या हातून निसटणार आहेत…
माढ्यात नेमकं काय होणार? याची क्युरिऑसिटी शेवटपर्यंत लागून राहिली होती. शरद पवारांनी आपली ताकद दाखवत मोहिते पाटलांना गळाला लावत त्यांच्या हाती तुतारी देऊ केली. मोहिते पाटील सोबत असतील तर जिल्ह्याचं राजकारण आपण हवं तसं फिरू शकतो, हे माहीत असल्यामुळेच भाजपाच्या रणजीत सिंह नाईक निंबाळकरांपेक्षा मोहिते पाटीलच निवडून येतील, असा कौल दिसून येतोय. अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या समजल्या जाणाऱ्या सातारच्या जागेला राष्ट्रवादीचा दुसरा बालेकिल्ला देखील म्हटलं जातं. उदयनराजेंचा चेहरा बदलला मात्र सातारकरांनी राष्ट्रवादीवरचा विश्वास कायम ठेवला. आता मात्र साताऱ्यात भाजपकडून उदयनराजे तर शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांच्या हाती तुतारी दिलीये. शशिकांत शिंदे यांची उमेदवारी आधीपासूनच साताऱ्यात वरचढ ठरणार, असं बोललं जात होतं. त्याचप्रमाणे एक्झिट पोलमध्येही सेम काहीसं असंच चित्र आहे. पश्चिम महाराष्ट्रातली पाचवी जागा म्हणजे दक्षिण नगरची. अजितदादांच्या गोटातील खासदारकीसाठी इच्छुक असणाऱ्या निलेश लंकेचा पक्षप्रवेश करवून घेत शरद पवारांनी मोठी खेळी केली. नगरमधील प्रस्थापित घराणं म्हणून ज्यांची ओळख आहे त्या विखे पाटलांना लंके टक्कर देणार आहेत. भाजपची भली मोठी प्रचार यंत्रणा आणि विखे पाटलांच्या वर्चस्वाच्या राजकारणाला नख लावत निलेश लंकेच यंदा खासदार होतील, असा कौल समोर आलाय. राष्ट्रवादीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील शरद पवार लढवत असणाऱ्या पाचही जागांवर विजयाचा गुलाल उधळण्याची तुतारीला संधी असल्याने शरद पवार पक्षामुळे आपण नसून आपल्यामुळे राष्ट्रवादी हा ब्रँड आहे, असं पर्सेप्शन बिल्डअप करतील.
तर दुसरीकडे अजित पवार बारामती, शिरूर मधून मार खाताना दिसतीलच पण त्यासोबत सुनील तटकरेंसारखा पहिल्या फळीतल्या नेत्याचाही निवडणुकीत पराभव होण्याचं सर्वेमधून समोर आलंय. त्यामुळे आधीच महायुतीत कमी जागा सुटलेल्या असताना त्यातही अजितदादांनी त्या प्रतिष्ठेच्या केल्या. आपण निवडून येऊच हा आत्मविश्वास जो आहे, त्याला मात्र कुठे तडा जातोय. असं एकंदरीत ओपिनियन पोलमधून समोर येतंय. अजित पवारांच्या पदरात पडण्याची शक्यता असणारा हा भला मोठा झिरो, त्यांच्या राजकारणाला शून्यात घेऊन जाण्याची शक्यताही दाट आहे. मात्र शरद पवारांनी या कठीण परिस्थितीतही संकटाशी दोन हात करत मैदान खेचून आणल्याचं दिसतंय…