औरंगाबाद – औरंगाबाद ग्रामीण पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्त रित्या कारवाई करत अवैध गुटख्याचा साठा जप्त केला आहे. पैठण तालुक्यातील बिडकीन येथे ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणाहून पोलिसांनी तब्बल 37 लाख 59 हजार 384 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. विशेष म्हणजे छाप्यात पकडलेल्या आरोपींना यापूर्वीही अनेकदा गुटखा विक्री करताना पकडण्यात आल्याचं समोर आलं आहे. यावेळी मात्र पोलिसांनी सापळा रचून मोठी कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिडकीन येथील चार वेगवेगळ्या ठिकाणी औरंगाबाद गुन्हे शाखा आणि बिडकीन पोलिसांनी छापे मारले. बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. पोलिसांना छाप्याच्या ठिाकणी हिरापान मसाला, गोवा मसाला, विमल आणि राजनिवास अशा नावाच्या गुटख्याची पाकिटं जप्त करण्यात आली. या कारवाईनंतर गुटखा माफियांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी केलेल्या कारवाईत, असलम हनिफ पठाण, युसूफ याकुब पठाण, परवेज रशिद पठाण आणि रिजवान मुख्तार शेख यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या करावाईत अटक कऱण्यात आलेला एक आरोपी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचंही समोर आलं आहे. एवढा मोठा गुटक्याचा साठा कुठून आला, या प्रकाराला कुणाचं पाठबळ आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.