हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच उसळून निघाले आहे. मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केल्यानंतर आता त्यांच्या पाठोपाठ धनगर समाजाने देखील आरक्षणाची मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर, मुस्लिम समाजाकडून देखील आरक्षणाची मागणी केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवरच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठे विधान केले आहे. “ब्राह्मणांना कुठलेही आरक्षण नाही हे परमेश्वराचे खूप मोठे उपकार आहे” असे नितीन गडकरी यांनी म्हणले आहे.
नुकतीच पार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गडकरी यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांना आरक्षणाच्या मुद्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बोलतानाच, आरक्षण नसल्यामुळे ब्राह्मण समाज व्यवसायाकडे वळला असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले. त्याचबरोबर, “परमेश्वराने ब्राह्मणांवर खूप मोठे उपकार केले आहेत. त्यांनी ब्राह्मण समाजाला कुठल्याही प्रकारचे आरक्षण दिले नाही” असे देखील ते म्हणाले.
पुढे बोलताना, “आज ब्राह्मणांना आरक्षण नसल्यामुळे ते वडापावचे दुकाणे टाकत आहेत. व्यवसायाकडे वळत आहेत. समस्या असतात काही समस्या शासकीय, व्यवसायिक असतात. काही आर्थिक असतात. पण तुमच्या मनातील इच्छाशक्ती मजबूच असेल तर पैशांच्या अडचणी कधीच येत नाहीत.” असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना नितीन गडकरी यांनी, जात, पंथ, धर्म, भाषा बाजूला ठेवून सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण द्यावे” अशी भूमिका मांडली. त्यामुळे आता नितीन गडकरी यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे विरोधकांकडून काय प्रतिक्रिया दिल्या जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.