महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत काय झालं? संजय राऊतांनी दिली माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aaghadi) जागा वाटपांच्या मुद्द्यावरून मोठ्या घडामोडी होताना पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवरच आज महाविकास आघाडीत महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी देखील हजेरी लावली होती. त्यामुळे आजच्या या बैठकीत नेमके काय घडले चर्चा कोणत्या मुद्द्यांवर झाली? याची माहिती स्वतः खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांना दिली आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, आज महाविकास आघाडीची बैठक झाली. “आजच्या या बैठकीत चारी पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. आता काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. आज आमची वंचित आघाडीसोबतही चर्चा झाली. प्रकाश आंबेडकर यांनी एक प्रस्ताव दिलेला आहे, त्यावरही आम्ही चर्चा केली. आमच्या सर्वांची इच्छा आहे की, प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी आमच्या सोबत असावी.”

आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत

त्याचबरोबर, “आजच्या या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. जागावाटपाबाबत आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. कोण किती जागा लढणार याबाबतची घोषणा एकत्रच केली जाईल. कोणतीही स्वतंत्र घोषणा होणार नाही. प्रकाश आंबेडकर एका बाबतीत पूर्ण समाधान आहे, ते म्हणजे या देशातून आणि राज्यातून मोदींची हुकूमशाही उखडून टाकायची आहे” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

दरम्यान, आज पार पडलेल्या बैठकीनंतर महाविकास आघाडीचे वंचित सोबत आणखीन एक बैठक पार पडणार आहे. ती बैठक अंतिम असेल असे सांगण्यात येत आहे. या बैठकीमध्येच कोणी किती जागा लढवायच्या यावर शेवटची चर्चा होईल. मात्र, आजच्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी 17 जागांवरील मतदारसंघांवर चर्चा केली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीत कोणाला किती जागा मिळतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.