सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
राज्यातील साखर कारखान्यांपेक्षा वीज कंपन्यांमध्ये मोठा घोटाळा आहे. 27 जलविद्युत प्रकल्प खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा जलसंपदा विभागाचा डाव आहे. खाजगीकरण करण्यामागे कोणाचा हात आहे, हे आता कळले पाहिजे. वीज प्रकल्प घेणार्या खाजगी कंपन्या या राज्यातल्या नेत्यांच्या आहेत. विजेचे जे बोके आहेत, त्यांना आम्ही करंट दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत केला.
विजेचे खासगीकरण, एकरकमी FRP साठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी शेतकर्यांचा मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शेट्टी पुढे म्हणाले की, “मागील अनेक वर्षे आपण साखर साखर कारखान्यांनी केलेले घोटाळे पाहिले आहेत. परंतू साखर कारखान्यांच्या घोटाळ्यापेक्षा वीज प्रकल्पाच्या खाजगीकरणाचा मोठा घोटाळा जलसंपदा विभागाकडून केला जात आहे. जलविद्युत प्रकल्पांना 35 वर्षे झाल्याचे कारण देऊन राज्यातील 27 प्रकल्प खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा डाव आहे.”
या प्रकल्पांच्या खासगीकरणात मोठा घोटाळा आहे. या प्रश्नावर संघटना राज्यभर आवाज उठविणार असल्याचं ते म्हणाले. देशामध्ये सर्वात जास्त घोटाळे हे गुजरातमध्ये होत आहेत. अशातच घोटाळेबाजांची चौकशी करण्याऐवजी ED आणि CBI मंडप डेकोरेटर्सची चौकशी करीत आहे. त्यामुळे ED ही खरोखरच ऐडी झाली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली.