बिहारचं यश हा तर मोदींच्या नेतृत्वाचा विजय, पंकजा मुंडेंनी फडणवीसांचं टाळलं नाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । बिहार विधानसभा निवडणुकांच्या विजयानंतर राज्यातील बहुतांश नेत्यांकडून विरोधी पक्षनेते आणि बिहारचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीचा हा विजय असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करताना, नक्कीच त्यांनी सुत्र हलवली असतील, त्यांचे अभिनंदन असे म्हटले. मात्र, भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडेंनी बिहार निवडणुकांचे यश हे मोदींच्या नेतृत्वाचा विजय असल्याचं म्हटलं आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दलाला बहुमत मिळालं आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला मागे पडलेल्या भाजपनं नंतर जोरदार मुसंडी मारली. गेल्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला भाजप यंदा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. भाजपाच्या विजयाचं श्रेय भाजप नेते प्रसाद लाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. त्यानंतर, आता आमदार नितेश राणे यांनीही ट्विट करुन बिहार निवडणुकांचं यश देवेंद्र फडणवीसांमुळेच असल्याचं ते म्हणाले. विशेष म्हणजे संजय राऊत यांनीही फडणवीसांचं अभिनंदन केलंय. मात्र, भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी आपल्या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख टाळला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा हा विजय असल्याचं त्यांनी म्हटलंय.

पंकजा मुंडेंनी ट्विट करुन बिहार विधानसभा आणि मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकांच्या विजयाबद्दल भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे. बिहार विधानसभा आणि विविध प्रदेशातील पोटनिवडणुकांमध्ये देशातील जनतेनं पुन्हा एकदा सुशासन, विकास आणि प्रगतीच्या राजकारणाचा स्विकार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या रणनितीचा हा विजय असल्याचं पंकजा यांनी म्हटलं आहे. तसेच, या विजयाबद्दल गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजपाच्या सर्वच कार्यकर्त्याचं मनापासून अभिनंदन करते, असेही पंकजा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment