Tuesday, June 6, 2023

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीचे कोट्यवधींचे नुकसान; सात दिवसांपासून बस आगारातच उभ्या

औरंगाबाद – एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा आज सलग सातवा दिवस. दररोज सुमारे 50 ते 60 लाखांपर्यंत उत्पन्न कमावणारी लाल परी बंद असल्यामुळे गेल्या सात दिवसात औरंगाबाद विभागाचे सुमारे साडेतीन कोटींचे नुकसान झाल्याची माहिती एसटी महामंडळाद्वारे देण्यात आली. त्याचबरोबर दिवाळी हंगामात जास्त कमाई होत असते मात्र आता हा हंगामही हातातून गेला आहे. आत्तापर्यंत 20 कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे. यात आज आणखीन काही कर्मचाऱ्यांची भर पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण या मुख्य मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी रविवारपासून पुन्हा संपावर गेले आहेत. त्याआधी 28 ऑक्टोबर रोजी ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारत बस बंद पाडल्या होत्या. त्यावेळी 1 ते 2 दिवसात काही मागण्या मान्य झाल्यामुळे संप मागे घेण्यात आला होता. मात्र दिवाळी उलटूनही मागण्या पूर्ण झाल्या नाही. कर्मचाऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा घोर निराशा पडली. त्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत मागे हटणार नाही, असे म्हणत एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. प्रत्येक सर्वसामान्य माणसासाठी प्रवासासाठी असलेले एकमेव साधन म्हणजे एसटी. निम्म्याहून अधिक लोकसंख्या एसटीवर अवलंबून आहे. आता सलग सात दिवस एसटी बंद असल्याने त्यात दिवाळीच्या काळातच हा संप पुकारला गेल्याने प्रवासी मात्र बेहाल झाले आहेत.

औरंगाबाद विभागाला दररोज 50 ते 60 लाखांचे नुकसान –
औरंगाबाद विभागातील सिडको, औरंगाबाद मध्यवर्ती, कन्नड, गंगापूर, पैठण, सिल्लोड, वैजापूर, सोयगाव या आठ आगारातून राज्यात तसेच राज्याबाहेर एसटीच्या दररोज सुमारे एक लाख ४० हजार किलोमीटरच्या फेऱ्या होतात. यातून एसटीच्या औरंगाबाद विभागाला दररोज सुमारे 50 ते 60 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. परंतु मागील सात दिवसांपासून सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीला सुमारे साडेतीन ते चार कोटी रुपयांवर पाणी फेरावे लागत आहे. सात दिवसांपासून संप सुरु असून अजूनही यावर तोडगा न निघाल्याने कर्मचारी संपावर ठाम आहेत. यामुळे एसटीचे अजून होणार हे मात्र नक्की.