बांधकाम विभागातील अधिकाऱ्याच्या लॉकर मध्ये कोट्यावधींचे घबाड 

 

औरंगाबाद – औरंगाबादमधील बांधकाम विभागातील एका शाखा अभियंत्याकडे लाखोंच रुपयांचं घबाड सापडलंय. बँकेतल्या एकाच लॉकरमध्ये इतकं मोठं घबाड सापडल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांचेही डोळे चकाकलेत. बांधकाम विभागातील लाचखोर अभियंत्याचं नाव संजय राजाराम पाटील आहे.

औरंगाबाद शहरातील एका मंदिराच्या सभागृहाच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी संजय पाटीलने सव्वा लाखाची लाच मागितली होती. त्यात तडजोड होऊन चाळीस हजाराचा पहिला हप्ता घेताना एसीबीने रंगेहात पकडले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याकडे पहिल्याच झडतीत कोट्यवधींचे घबाड सापडल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. लाचलुचपत विभागाकडून अटक झाल्यानंतर त्याची घरझडती घेतल्यानंतर एक लॉकर समोर आले. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी लॉकर उघडलं आणि पाचशे आणि दोन हजाराच्या बंडल भरलेलं लॉकर पाहून अधिकाऱ्यांचे डोळे विस्फारले. त्या एकाच लॉकरमध्ये 85 तोळे सोन्याचे दागिने आणि 26 लाख 4 हजार 500 रुपयांची रोकड सापडली आहे.

एसीबी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे केवळ एका लॉकरमधले आहे. आणखी किती लॉकरमध्ये आहेत? किती बँकेत खाती आहेत?, घरात किती रोकड लपवून ठेवलेली आहे आणि कुठे कुठे जमीन प्लॉट आणि घराची मालमत्ता आहे याची तपासणी सध्या सुरू आहे.लाचखोर संजय पाटीलने लाचेच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्थावर मालमत्ता खरेदी केल्याची शक्यता वर्तविली जातेय. शिवाय शेती, फ्लॅट, प्लॉट, बंगला यामध्येसुद्धा गुंतवणूक केल्याची शक्यता असल्याने त्या मालमत्तेची खुली चौकशी होणार आहे. त्या चौकशीनंतर आणखी किती घबाड हाताला लागेल हे आतातरी सांगणं कठीण आहे. मात्र पहिल्याच झडतीत मोठं घबाड हाती लागल्यानंतर या लाचखोर अधिकार्‍याकडे मोठी माया असेल अशी अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.