उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत, त्यांनी देशाची माफी मागावी – भाजपची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बोलताना जोरदार बॅटिंग करत विरोधकांवर चौफैर हल्लाबोल केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील सोडलं नाही. यावेळी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रावर निशाणा साधताना शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला की पळे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. दरम्यान, यावरून भाजप नेते अतुल भातखलकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे. अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले की, “चीनसमोर पळ काढे” असे निलाजरे विधान करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भारतीय सैनिकांचा अपमान केला. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत. जवानांचा अपमान केल्या बद्दल मुख्यमंत्र्यांनी देशाची माफी मागावी, असं म्हणत जनता या ‘राहुल गांधीगिरी’चा समाचार घेईलच, असा इशारा देखील दिला आहे.

नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे –

दिल्लीच्या सीमेवर जे शेतकरी आंदोलन करत आहे. त्यांना दिल्लीत येता येऊ नये, यासाठी शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे ठोकले. ज्या तारांचं कुंपण देशाच्या सीमेवर टाकले पाहिजे, ते राजधानीच्या रस्त्यावर टाकले आहे.  मात्र चीनसमोरून मात्र या सरकारने पळ काढला. शेतकऱ्यांच्या मार्गावर खिळे आणि चीन दिसला की पळे, अशी यांची अवस्था आहे. असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’