हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भारतीय हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज आता खरे ठरताना दिसत आहे. मुंबई आणि पश्चिम किनारपट्टी सह, रायगड मध्ये देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत पाऊस दाखल झाल्याने मात्र मुंबईकरांची त्रेधातिरपीट सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचले असून मुंबईची तुंबाई झाल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर ही पाणी आले असून लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. मुंबईतील पावसा वरूनच विरोधकांनी मुंबई महापालिकेच्या विरोधात टीकास्त्र डागले आहे. ‘ आता पावसाची जबाबदारीही मोदींवर ढकलतील असा टोला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी लगावत अप्रत्यक्षरीत्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
पावसाळ्यातील पालिकेच्या नियोजनाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, मनपा किंवा राज्य सरकार आता बहुतेक पावसाची जबाबदारीसुद्धा मोदींवर ढकलतील आणि मोदींनी त्यातून मार्ग काढावा म्हणतील. ते तरी म्हणू नये हीच आमची अपेक्षा आहे. मुंबईच्या आयुक्तांनी आम्हाला विचारलं तर आम्ही त्यांना भ्रष्टाचार कमी करून आता तरी नालेसफाई नीट करा आणि पाणी साठण्याच्या जागा आहे तिथली कामं पूर्ण करावीत असं सांगू. असे ते यावेळी बोलताना म्हणाले. भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी एल संतोष, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच इतर भाजप नेत्यांच्या पार पडलेल्या बैठकीनंतर भातखळकर प्रसार माध्यमांशी बोलत होते.