हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 2024 लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान होतील याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली असा मोठा दावा युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी केला आहे. उस्मानाबाद येथील युवा सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम केलं. त्यांची लोकप्रियता वाढत होती. उद्धव ठाकरे पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले असते तर 2024 ला पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार होऊ शकतात . तसंच सगळ्या भाजपविरोधी पक्षांचा त्यांना पाठिंबा मिळाला असता आणि ते पंतप्रधान होतील या भीतीने भाजपने शिवसेना फोडली असं वरुण सरदेसाई म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षातील क्रमांक दोनचे नेते होते. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नेते मानले जात होते. तरीही त्यांनी बंडखोरी केली असं वरूण सरदेसाईंनी म्हंटल.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आपल्या 40 समर्थक आमदारांसह शिवसेनेतून बंडखोरी केली आणि भाजपसोबत सत्तास्थापन केली. शिंदेंच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि उद्धव ठाकरेंना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राज्यात त्यानंतर शिवसेनेला अनेक ठिकाणी खिंडार पडले आहे. अनेक पदाधिकारी, नगसेवक एकामागून एक शिंदे गटात प्रवेश करत असून उद्धव ठाकरेंच्या समोरील अडचणी वाढतच चालल्या आहेत. सध्या ठाकरे vs शिंदे सत्तासंघर्ष घटनापीठासमोर आहे. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हे आता न्यायव्यवस्थाच सांगेल.