हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर निशाणा साधला आहे. अजित पवार हे नेमकं राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत की पुण्याचे उपमुख्यमंत्री आहेत असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. आज सकाळी पुण्यातल्या मानाच्या कसबा गणपतीचं दर्शन चंद्रकांत पाटील यांनी घेतलं. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अजितदादांवर टीका केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत की पिंपरी-पुण्याचे? पूर्ण कोविड काळात ते नागपूरला गेले, चंद्रपूरला गेले, गडचिरोलीला गेले, भंडाऱ्याला गेले असं कधी कळलंच नाही. त्यामुळे त्यांनी काल घोषित केलं की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका माझ्या नेतृत्वाखाली…स्वतःला किती लहान करुन घेतलं”.
दरम्यान, भाजपातील महत्त्वाचे नेते संपर्कात असल्याच्या सत्ताधाऱ्यांच्या विधानांवर बोलत असताना चंद्रकात पाटील म्हणाले की, ‘सनसनाटी बातम्या निर्माण केल्याने काही होत नाही. २० ते २२ महिने झाले असंच चालंय. एकाही आमदाराला ते आमच्या हात लावू शकले नाहीत. कितीही माणसं पळवायचा प्रयत्न केला तरी लोकांचं मोदींवर प्रेम आहे. लोकांचं त्या नगरसेवकावर प्रेम नाही. जाणाऱ्याने विचार करावा. पुन्हा इकडे येण्याची वाट बंद आहे असा इशारा त्यांनी दिला.