हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका अद्याप सुरूच आहे. चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोटबँक तयार केली असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावर स्पष्टीकरण देतानाही नव्या वादाला तोंड फुटणारं वक्तव्य केलं आहे.
‘मी म्हणालो की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंची वोटबँक तयार केली. त्याचा अर्थ असा नाही की ईव्हीएम मशिन घेऊन तयार केली. तर त्यांनी जनमत तयार केलं त्यात चुकलं काय?’, असा सवाल देखील चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला. ‘याच वक्तव्याला घेऊन कुणीतरू निदर्शने करणार होतं. मला धमकी आली, मात्र हम किसीको टोकेंगे नही, किसीने टोका तो छोडेंगे नही, असा इशाराही चंद्रकांत पाटलांनी दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सर्वधर्म समभावाची नाही. त्यांनी शंकराची पूजा केली आणि हिंदू धर्माची पूजा केली. कारण हिंदू धर्म हा सर्वधर्म समभाव शिकवतो, असं वक्तव्यही पाटील यांनी केलं आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या विधानाने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.