मुंबई प्रतिनिधी |नितेश राणे यांनी मुंबई गोवा महामार्गाची झालेली दुरावस्था बघून महामार्ग उपाभियंता प्रकाश शेडकर यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर चिखल फेकल्याची घटना मागील काही दिवसापूर्वी घडली. त्यानंतर नितेश राणे यांना अटक झाली. तसेच निवडणुकीच्या तोंडावर नोकरशाहीचा रोष नको म्हणून त्यांच्या कुटुंबाची चंद्रकांत पाटील यांनी भेट देखील घेतली. त्यावेळीची त्यांची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याने आता राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी महामार्ग उपाभियंता प्रकाश शेडकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली तेव्हा त्यांच्या कुटुंबाला सरकार तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला. तसेच आपण नितेश राणे यांच्यावर भारतीय दंड संहितेचे कलम ३०७ अर्थात खूनाचा प्रयत्न करणे हे कलम लावण्यास सांगितले आहे असे चंद्रकांत पाटील त्यांच्या कुटुंबियांना म्हणाले. या व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने हे प्रकरण आणखीनच चिगळले आहे
चंद्रकांत पाटील यांना स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी मात्र घराचा आहेर देण्याचा प्रयत्न केला आहे. नितेश राणे यांच्या आंदोलनाला स्थानिक भाजपने पाठिंबा दर्शविला होता. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली असून चंद्रकांत पाटील यांनी या महामार्गाची पाहणी करावी असे देखील म्हणले आहे.