…तर मी राऊतांचे डोकं तपासेल; चंद्रकांतदादांचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ज्या देशात आज शेतकरी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहेत तो जर कुणाला शोक वाटत असेल, दुःख वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावल्यानंतर पाटलांनी राऊतांवर पलटवार केला आहे. संजय राऊतांनी माझी मानसिकता तपासली तर मी त्यांचं डोकं तपासेल असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “संजय राऊत सार्वजनिक बोलले, मात्र मी समोर असताना बोलले नाहीत. संजय राऊत डॉक्टर आहेत. त्यामुळे मी वेगळा डॉक्टर न शोधता त्यांच्याकडेच जातो म्हणजे आमचा जरा संवाद देखील होईल. नवाब मलिक, संजय राऊत काहीही संदर्भ नसलेल खोट का बोलत आहात, असा संवाद यावेळी करता येईल. यावेळी संजय राऊतांनी माझी मानसिकता तपासली तर मी त्यांचं डोकं तपासेल.”

संजय राऊत नेमकं काय म्हणाले-

मी आता चंद्रकांत पाटलांना शोकसंदेश पाठवतो. त्यांच्यासाठी कृषी कायदे मागे घेणं ही दुःखद घटना असेल तर आपण त्यांच्यासाठी एखादी शोकसभा घेऊ आणि शोक व्यक्त करू. ज्या देशात आज शेतकरी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहेत तो जर कुणाला शोक वाटत असेल, दुःख वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल.