हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या देशात लोकशाही आहे. दंडुकेशाही चालणार नाही, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला ठणकावलं आहे. काल मुंबई येथील शिवसेना भवनासमोर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये घमासान रंगलं त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी आपला राग व्यक्त केला. तुम्ही हिंदुत्व सोडणार आणि आमच्या हिंदुत्वावर टीका करणार तर कसं सहन होईल? असा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला.
चंद्रकांत पाटील म्हणाले , तुम्ही रोज सामानातून वाट्टेल ते लिहिणार, जे लिहिता त्याला आधारही नसतो. त्यावर निदर्शने करायची नाही का? रोषही व्यक्त करायचा नाही का? काल झालेला राडा हा मुंबई महापालिकेची तयारी वैगरे नव्हती, तो भावनिक प्रश्न होता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तुम्ही हिंदुत्व सोडलं म्हणून अंतर निर्माण झालं. तुम्ही हिंदुत्व सोडणार आणि आमच्या हिंदुत्वावर टीका करणार तर कसं सहन होईल? ही लोकशाही आहे. त्यामुळे तुमची दंडुकेशाही नाही चालणार. आंदोलकांच्या हातात दगड, गोटे नव्हते. जे काही असेल ते सीसीटीव्हीत येईलच, असं सांगतानाच 15 दिवसांपूर्वी शिवसेनेने भाजप कार्यालयासमोर आंदोलने केली. त्याआधी काँग्रेसनेही आंदोलने केली. तेव्हा आम्ही अडवलं नाही असेही पाटील यांनी म्हंटल.