हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर राज्यातील वातावरण तापल होत. त्यानंतर 31 जुलै अखेर सर्व नियुक्त्या करण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. मात्र अद्याप पदे भरली नसल्याने भाजपकडून अजित पवारांवर टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “मी आजवर अनेक वेळा म्हटलं की, अजित पवार सकाळी सात वाजल्यापासून कामाला सुरुवात करतात. अजित पवारांसारखा शब्दाला पक्का माणूस नाही. पण आता शब्द पाळायला हवा होता, मात्र त्यांनी शब्द फिरवणं म्हणजे आश्चर्य आहे”, असं पाटील म्हणाले.
अजित पवारांनी ३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा केली होती. पण आता ते जर आपण दिलेल्या शब्दावरून पलटी मारत असतील तर मग कठीण आहे. महाविकास आघाडी सरकार अत्यंत खोटारडे सरकार आहे. निवडणूक होईपर्यंत हे सर्व चालते, पण नंतर कळते. महाविकास आघाडी सरकारला लोक धडा शिकवतील’, असेही पाटील म्हणाले.