व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

बावनकुळेंचा पत्ता कट करणे भाजपाला पडले महागात

विशेष प्रतिनिधी ।  विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल काल लागला. अपेक्षेप्रमाणे महायूतीला जोरदार यश मिळाले. पण स्वतः मुख्यमंत्री नेतृत्व करत असलेल्या नागपूर मध्ये ‘भाजपा’ला मोठा फटका बसला. दरम्यान ‘भाजपा’चे वरिष्ठ नेते आणि उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापल्यामुळे विदर्भात भाजपला मोठा फटका बसला आहे, अशी चर्चा सध्या विदर्भात सुरु आहे. बावनकुळे हे नितीन गडकरी गटातले असल्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला असल्याचेही मतही काही राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे. विदर्भ हा भाजपचा गड म्हणून ओळखला जातो. विदर्भात भाजपचा मोठ्या प्रमाणात मतदार आहे. गेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने सर्वाधिक 40 जागांवर विजय मिळवला होता. मात्र तेली समाजाची मतं फिरल्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला फक्त 30 जागांवर विजय मिळवता आला आहे. विशेष म्हणजे भाजपचा गड आणि आरएसएस मुख्यालय असेलल्या नागपुरात भाजपच्या सहा जागांवर पराभव झाला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे हे तेली समाजाचे आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तेली समाज भाजपसोबत होता. पण बावनकुळे तसेच इतर तेली समाजाच्या नेत्यांना भाजपने उमेदवारी न दिल्यामुळे विदर्भात भाजपला मोठा फटका बसला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीतही नितीन गडकरी तेली समाजाच्या जोरावर मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते, असं राजकीय विश्लेषकांनी सांगितले. विदर्भातली प्रत्येक मतदारसंघात कमीत कमी 30 हजार आणि जास्तीत जास्त 70 हजार तेली समाजाची मतं आहेत. मात्र ही मतं यंदा भाजपला खेचता आली नाही. तर काँग्रेसने सर्वाधिक तेली समाजाच्या नेत्यांना उमेदवारी देत विदर्भात आपला दबदबा निर्माण करण्याच प्रयत्न करत दहा जागांवर विजय मिळवला. विशेष म्हणजे यावेळी अर्थमंत्री यांच्याही मताधिक्यामध्ये घट झाल्याचे दिसत आहे, असंही राजकीय विश्लेषकांनी सांगितले.